2 Samuel 16

1डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. 2राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे.”

3राजाने त्याला मफिबोशेथाचा ठावाठिकाणा विचारला सीबाने सांगितले, मफिबोशेथ यरूशलेममध्येच आहे. कारण आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील असे त्याला वाटते. 4तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफिबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्या नमन करतो. मी तुम्हाला आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.

5पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता. 6त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला.

7शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तु दुष्ट आहेस तू खूनी आहेस! 8देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांना तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.

9सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्यासारख्या माणसाने तुम्हाला शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करू द्या. 10पण राजा त्याला म्हणाला, सरूवेच्या पुत्रांनो मी काय करू? शिमी मला शाप देत आहे. पण परमेश्वरानेच त्याला तसे करायला सांगितले आहे. मग त्याला असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?

11अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामीनी हे असे करत आहे तर त्यात नवल काय. त्याला हवे ते म्हणू द्या, कारण देवानेच त्याला सांगितले असेल. 12माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.

13दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता. 14राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.

15अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरूशलेम येथे आले. 16दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.

17अबशालोम त्याला म्हणाला, तू आपल्या मित्राची दावीदाची साथ का सोडलीस? तू ही त्याच्याबरोबर यरूशलेम का सोडले नाहीस? 18हूशय म्हणाला, परमेश्वर ज्याची निवड करेल त्याला माझा पाठिंबा आहे. परमेश्वराने आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे.

19पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो, आता तशीच तुमची सेवा करणार.

20अबशालोमने अहिथोफेलला विचारले आम्ही काय करावे ते सांग. 21अहिथोफेल त्याला म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल.

22मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली. अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांना त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटत.

23

Copyright information for MarULB